भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नावर सचिन पायलट यांनी दिलं हे उत्तर
सचिन पायलट यांच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष
नवी दिल्ली : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अभिमन्यू पुनिया यांनीही मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. पुनिया म्हणाले की, ताज्या घडामोडींच्या निषेधार्थ युवा काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि सेवा दलातील विविध पदांचा अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
सचिन पायलट यांनी म्हटलं की, 'राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी खूप काम केलं आहे. पण मी भाजपमध्ये जाणार नाही.'
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध राजकीय संघर्षात सचिन पायलट यांना पक्षाने बाजुला केलं आहे. पण त्यांना अजून काँग्रेसने पक्षातून काढलेलं नाही. तर सचिन पायलट यांनी देखील पक्ष सोडण्याबाबत कोणतंही विधान केलेलं नाही. सचिन पायलटवर काँग्रेसच्या कारवाईनंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजी दर्शवली आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं की, "मी सचिन पायलट यांना एक चांगला आणि प्रतिभावंत नेता मानतो. पक्षातून वेगा मार्ग काढण्यापेक्षा त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी दिशा देण्यासाठी काम केलं पाहिजे होतं. यामुळे त्यांचं, आमचं आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली असती."
काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांनी अनेक वर्ष समर्पण भावाने काम केलं आहे. आशा आहे की, परिस्थिती सांभाळली जावू शकते. पण दु:ख यांचं आहे की, परिस्थिती इतपर्यंत पोहोचली.'