सचिन पायलट भाजपमध्ये जाण्याची शक्यता, घेऊ शकतात नड्डा यांची भेट
सचिन पायलट बंडखोरी करणार का याकडे आता लक्ष...
जयपूर : राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या सरकारवर संकटाचे ढग जमले आहेत. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोर भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर, सूत्रांचे म्हणणे आहे की सचिन पायलट सोमवारी सकाळी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊ शकतात.
उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपमध्ये सामील झाले तर राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारला मोठा धक्का बसणार आहे. दुसरीकडे सचिन पायलट यांचा असा दावा आहे की त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये काँग्रेस व अपक्ष आमदारांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आमदारांसह ते भाजपमध्ये सामील झाल्यास गहलोत सरकार अल्पमतात येईल.
सूत्रांचे म्हणणे आहे की, सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे 27 आमदारही भाजपमध्ये येऊ शकतात. याशिवाय तीन अपक्ष आमदारदेखील पायलट यांना पाठिंबा देत भाजपमध्ये येऊ शकतात. सचिन पायलट यांचे समर्थक आमदार सकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी सभापतींकडे राजीनामा पाठवू शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही भेट घेतली. त्यांनी देखील काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सचिन पायलट हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे 40 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.