गहलोत सरकारवरील संकट कायम, सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम
राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम आहे.
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी अजूनही सुरुच आहेत. कोण बाजी मारेल हे अजूनही सांगता येणार नाही. सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे.
पायलट यांचे समर्थक दावा करत आहेत की, त्यांच्याकडे 30 आमदारांचं समर्थन आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता पुन्हा काँग्रेसची बैठक होणार आहे. पण सचिन पायलट या बैठकीत ही जाणार नसल्याचं समोर येतं आहे. सचिन पायलट यांच्या सोबतच्या इतर बंडखोर आमदारांना देखील बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे.
काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पक्षाचे दरवाजे खुले आहेत. पण या आवाहनानंतर प्रश्न असा उभा राहतो की, जर सचिन पायलट यांनी पक्ष सोडलाच नाही तर मग ते दरवाजे खुले ठेवण्याचा प्रश्न कुठे येतो?
सचिन पायलट माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसशी चर्चा निराधार आहे. आम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी बोललो नाही. आम्ही कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या संपर्कात नाही. ही आता आमच्या स्वाभिमानाचा लढा आहे. पायलट यांच्या या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की ते माघार घेणार नाहीत.
सोमवारी दुपारी अशोक गहलोत यांनी 109 आमदारांसह मीडिया परेड केली. परंतु पायलट कॅम्पचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या सरकारवर संकटाचं ढग असल्याचं दिसून आलं. 109 आमदारांची उपस्थिती असली तर देखील गेम काही वेगळा होऊ शकतो.
काँग्रेसकडेही पर्याय उरलेला नाही. दोन गट वेगळे झाले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पायलट समर्थकांबाबतही निर्णय घेण्यात येऊ शकतो. पायलट यांच्या रणनीतीमुळे जर काँग्रेसचं सरकार पडलं तर मग कोण सरकार स्थापन करणार? असा प्रश्न उपस्थित होतो. भाजपने जर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या. तर पायलट यांना भाजप मुख्यमंत्री करणार का? तर मग वसुंधरा राजे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार असे अनेक प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. गहलोत सरकारवरील संकट अजूनही कायम आहे.