नवी दिल्ली : राजस्थानात काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय. सत्तेची सूत्रे युवा नेत्याकडे द्यावीत की ज्येष्ठ नेत्याकडे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची युवा नेत्याला पसंती आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची अशोक गेहलोत यांना पसंती दिसत आहे. त्यामुळे हा तिढा अधिक वाढलाय. दरम्यान, सचिन पायलट यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होण्यास उशीर होत असल्याने काँग्रेस प्रवक्ते इंद्रमोहन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट राहुल यांच्याकडेच सोपविलाय. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींवर दबाव वाढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मोठी चुरस निर्माण झालेय. दरम्यान, सचिन पायलट यांचे समर्थक इंद्रमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री बनविण्यास विलंब झाल्यामुळे इंद्रमोहन यांनी हे पाऊल उचलले आहे. इंद्रमोहन सिंग हे राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आहेत.


मुख्यमंत्री नावाच्या घोषणेपूर्वी कडक सुरक्षा 



सकाळी सचिन पायलट यांच्या घराबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पायलट, गेहलोत यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 


दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तशा घोषणाही ते देत आहेत. मोठ्या संख्येने समर्थक जमत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेय. सुरक्षा आणि स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही समर्थक आपापसांत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.