`तो` भारतीय जवान वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढवणार
मोदी भारतीय जवानांच्या नावाने मतांचा जोगवा मागतात.
नवी दिल्ली: भारतीय लष्करातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार करणारा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) माजी सैनिक तेज बहादूर यादव वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. तेज बहादूर यादव यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. मला अनेक पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी विचारणा झाली. मात्र, मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करातील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे यादव यांनी सांगितले. तेज बहादूर यादव सध्या आपल्या सहकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. जास्तीत जास्त मतदारांना आकृष्ट कसे करता येईल, यावर त्यांचा भर आहे. लवकरच ते आपल्या सहकाऱ्यांसोबत वाराणसीला रवाना होणार आहे. तेज बहादूर हे हरियाणाच्या रेवारी येथील रहिवासी आहेत.
निवडणुकीतील विजय किंवा पराभवाची मला चिंता नाही. या माध्यमातून मला सैन्यातील जवानांना विशेषत: निमलष्करी दलातील सैनिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे लोकांसमोर मांडायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जवानांच्या नावाने मतांचा जोगवा मागतात. मात्र, त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना शहीदाचा दर्जा देण्यासही सरकारने नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
'महिना उलटला पाकिस्तान मृतदेह मोजतंय आणि हे पुरावे मागतायत'
२०१७ साली तेज बहादूर यादव यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. या प्रकारानंतर तेज बहादूर यादव यांची चौकशी झाली आणि त्यांना लष्करातून बडतर्फ करण्यात आले होते.