सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?
Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे.
Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय. नॉर्थ-इस्टचे नागरिक चिनी दिसतात. तर दक्षिण भारतीय लोकं आफ्रिकन दिसतात, असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली. निवडणुकीच्या वेळी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता काँग्रेस बॅकफूटवर जाणार का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
काँग्रेस अन् मित्रपक्ष नाराज
सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेबद्दल दिलेली उपमा चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवते, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी देखील सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर टीका केली. मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही. पण ते जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत, काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत आणि ते या देशात राहतात का? ते परदेशात राहतात, असं प्रियांदा चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील वारंगलमध्ये सभा घेत असताना सॅम पित्रोदा यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या तत्वज्ञानाने कातडीच्या आधारे देशवासीयांचा अपमान केला. शिवीगाळ केली. आज मला खूप राग आलाय. लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण असं विधान मला सहन झालं नाही. माझ्या देशातील लोकांच्या त्वचेच्या रंगावरून त्यांची गुणवत्ता ठरवली जाईल का? कातडीच्या रंगाचा खेळ खेळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक माझ्या देशाचा अपमान करत आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
वारसा कर अन् वाद
दरम्यान, अमेरिकेतील शिकागोमध्ये बोलताना पित्रोदा यांनी तेथील एक करप्रणाली भारतामध्येही लागू करण्यासंदर्भात विचार करता येईल का याबद्दलची चाचपणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेमध्ये वारसा कर नावाची एक पद्धत आहे. या करप्रणालीनुसार जर एखादी व्यक्ती 10 कोटी डॉलर्सहून अधिक संपत्तीची मालक असेल तर तिलाच हा कर लागू होतो. 10 कोटी डॉलर्सहून किंवा त्याहून अधिक मालमत्ता नावावर असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या संपत्तीपैकी केवळ 45 टक्के संपत्ती या व्यक्तीच्या मुलांना हस्तांतरित करू शकतो, असं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. त्यावेळी देखील भाजपने जोरदार टीका करत काँग्रेसला निशाण्यावर घेतलं होतं.