आता तुम्हाला मी सांगिंतलं तर धक्काच बसेल; जया बच्चन भडकल्या
आता मला असं वाटतंय की....
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता त्याविषयीच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटण्यास सुरुवात झाली आहे. कायमच महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मतं मांडणाऱ्या आणि तितक्याच ठाम भूमिका घेणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी पुन्हा एकदा संतप्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेचा संदर्भ देत महिला अद्यापही येते सुरक्षित नसल्याचं त्या स्पष्टपणे म्हणाल्या आहेत.
'उत्तर प्रदेशात सुरक्षा आहे कुठे? इथे कोणालाच कोणतंही संरक्षण नाही. आता जर मी काही घटना सांगितल्या ना, तर तुम्हाला धक्काच बसेल', असं बच्चन संसदेबाहेर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाल्या. उत्तर प्रदेशात वारंवार घडणाऱ्या काही गंभीर घटना आणि त्यांमध्ये महिलांचा जाणारा बळी या मुद्द्यावर त्यांनी लक्ष वेधलं.
चित्रकूट आणि उन्नावसारख्या घटना पाहता राज्यात उघडपणे कायदा आणि सुव्यवस्थेची अवहेलना होत आहे, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांचा संताप व्यक्त होत होता. 'हे काय चाललंय काय? आम्ही जर कठोर शब्दांत काही म्हणालो, तर आम्हाला सांगितलं जातं की असं आम्हाला बोलायला नको हवं होतं. आता मला असं वाटतंय की रागाच्या भरात तुम्ही माझ्यासमोर उभे आहात तर तुम्हालाच मारेन वगैरे... ', या शब्दांत जया बच्चन यांनी पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये होणाऱ्या घटनांवर कटाक्ष टाकला.
नुकतंच त्यांनी हैदराबाद येथे तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणीही नाराजी व्यक्त केली होती. बलात्कार करणाऱ्यांना जमावाच्या हवाली करायला हवं अशी मागणी केली होती. सोबतच, त्यांनी अशा गुन्ह्यांना शासनाकडूनही योग्य आणि सडेतोड असं उत्तर मिळायला हवं अशी आर्जव केली होती.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हैदराबाद आणि त्यानंतर आता उन्नाव बलात्काराच्या घटनेप्रती संताप व्यक्त केला गेला. सध्याच्या घडीला देशभरातून या घटनेप्रती संतापाची लाट उसळली आहे. जनमानसांतून पीडितांना न्याय मिळावा या मागणीने जोर धरला आहे, तर बलात्काऱ्यांना अद्दल घडवत कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणीही उचलून धरण्यात आली आहे.