रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केल्यानंतर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी चांगलीच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 'शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाय महाराष्ट्रात ते काँग्रेसशी जुळवण्याचा प्रयत्न त्यामुळे त्यांना विरोधी बाकांवर जागा देण्यात येत आहे' या जोशींच्या वक्तव्यालाही त्यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. 'झी २४ तास'शी बोलताना, 'भाजपानं आम्हाला विरोधी पक्षात ढकललं होय... मी पुन्हा सांगतोय आम्हाला ढकललंय...' असं म्हणत 'ढकललं' या शब्दावर त्यांनी चांगलाच जोर दिला. 'सरकार बनवण्यासाठी वेळ घ्यावा लागेल' असंही त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्हाला काढण्याचा निर्णय लल्लू-पंजुंनी घेतलाय. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? एनडीए ही एका पक्षाच्या मालकीची आहे का?' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला पुन्हा एकदा घाम फोडलाय.


'एनडीएतून बाहेर काढण्याआधी आमच्यासोबत कोणतीही चर्चा का केली गेली नाही? चर्चा झाली असती तर दूध-पाणी स्पष्ट झालं असतं... यातून भाजपाचं ढोंग आणि खोटारडेपणा उघड झालाय... मुखवटे फाटले...' असं म्हणत ५०-५० टक्क्यांच्या सत्तावाटणीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला. 


'एनडीए'च्या बैठका कधी घेतल्या गेल्या? 'एनडीए'चे प्रमुख मोदी आहेत का? प्रल्हाद जोशी संसदीय कार्यमंत्री आहेत ते एनडीएचे प्रमुख नाहीत...' असं म्हणत त्यांनी भाजपाच्या सत्ताकारणावर आणि कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना 'आम्ही विरोधी बाकावर भूमिका बजावू' असं म्हटलंय. 


विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेची बाजू जोरदार लावून धरणाऱ्या संजय राऊतांनी 'संसदेच्या बाहेर रस्त्यावर आमच्या खुर्च्या ठेवल्या तरी आमचं काम चालू राहील... संसदेत आमची जागा बदलली म्हणून चिंता नाही, आमचा जन्मच विरोधासाठी झालाय... आम्ही स्ट्रीट फाईटर... सत्ता घेणारे आणि देणारे हे कोण आहेत?' असं म्हणत भाजपाला जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. 


'आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या भेटी घेणार... त्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही? मेहबूबा मुफ्तींसोबत जाताना भाजपाने आम्हाला विचारलं होतं का?' असे चिमटे काढतानाच 'दिल्लीतील हवा चांगली नाही, आम्ही हवा शुद्ध करणार आहोत' असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.