काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला आहे. 28 मिनिटांच्या चर्चेत राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी, जातीय जनगणना, मणिपूर हिंसा यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं छातीठोकपणे सांगितलं. "निवडणुकीला फक्त 6 महिने राहिले आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे मी लिहून देतो," असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरबद्दल बोलताना सांगितलं की, तेथील लोकांवर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. तेथील लोकांना जिंकूनच तुम्ही काही करु शकता. मी त्या लोकांना विश्वासात घेतलं होतं. 


सत्यपाल मलिक म्हणाले, मला वाटतं त्यांचा राज्याचा दर्जा पुन्हा परत केला पाहिजे. यांनी कलम 370 हटवून त्याला केंद्रशासित प्रदेश केलं आहे. तिथे राज्य पोलीस बंड पुकारेल अशी भीती त्यांना होती. पण जम्मू काश्मीर पोलिसांनी नेहमीच केंद्र सरकारला साथ दिली आहे. अमित शाह यांनी राज्याचा दर्जा पुन्हा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत करावा आणि निवडणूक घ्यावी. 


राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलं असता सत्यपाल मलिक म्हणाले की, "यांनी पुलवामा हल्ला केला असं मी म्हणणार नाही. पण यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि राजकीय फायदा उचलला. मतदान करायला जाल तेव्हा पुलवामामधील शहीदांचा आठवण ठेवा असं त्यांचं वाक्य आहे". यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की, विमानतळावर जेव्हा शहिदांचे पार्थिव आणण्यात आले, तेव्हा मला रुममध्ये बंद कऱण्यात आलं होतं. मी भांडून तेथून बाहेर पडलो होतो. 


सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, "पंतप्रधानांनी श्रीनगरला जायला हवं होतं. राजनाथ सिंग तिथे आले होते. मी तिथे होतो, आम्ही श्रद्धांजली वाहिली. ज्या दिवशी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नॅशनल कार्बेटमध्ये शुटिंग करत होते. मी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही. 5-6 वाजता त्यांनी फोन केला असता मी सगळा घटनाक्रम सांगितला. आपल्या चुकीमुळे इतके लोक मारले गेल्याचं मी म्हटलं. त्यावर त्यांनी तुम्ही काही बोलू नका सांगितलं. नंतर मला अजित डोभाल यांचा फोन आला. त्यांनीही काही बोलू नका सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, कदाचित तपासावर याचा प्रभाव पडेल. पण काहीच झालं नाही आणि होणारही नाही".