आम्ही संकटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारले- मोदी
आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते.
नवी दिल्ली: आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीमधून बाहेर काढत शिस्त लावली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया'च्या (असोचेम) वार्षिक संमेलनात बोलत होते. यावेळी मोदींनी व्यासपीठावरून उद्योगक्षेत्रासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या सुधारणांचा पाढा वाचून दाखवला.
त्यांनी म्हटले की, पाच-सहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था संकटाकडे वाटचाल करत होती. मात्र, आमच्या सरकारने अर्थव्यवस्थेला केवळ स्थिरताच दिली नाही तर शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उद्योगक्षेत्राच्या मागण्यांकडे लक्ष पुरवले. त्यामुळे आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते. परंतु, आमचे सरकार हे १३० कोटी भारतीय जनतेचे एंजट आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
यावेळी मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी सक्षम असल्याचा पुनरुच्चार केला. आमच्या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये औपचारिक व्यवस्था निर्माण केली. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थव्यवस्थेला आधुनिक आणि गतीमान केले, असा दावा मोदींनी केला.
तुम्ही एका रात्रीत इज ऑफ डुईंग बिझनेसच्या (उद्योगधंद्यांसाठी अनुकूल) यादीत वरचे स्थान मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अगदी खालच्या स्तरापासून धोरणांमध्ये बदल करावे लागतात, दिवसरात्र मेहनत करावी लागते, असे मोदींनी यावेळी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर साडेचार टक्क्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेचा भडिमार सुरु आहे.