नवी दिल्ली : नुकताच श्रावण महिना सुरु झाला आणि मांसाहार प्रेमींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. 'आता आमचं कसं होणार...' हाच त्यांना पडलेला प्रश्न. सणावारांचा महिना अशी ओळख असणाऱ्या श्रावण महिन्यात बरेचजण मांसाहाराचा त्याग करतात. उपवासांचा महिना अशीही ओळख असणाऱ्या या महिन्यात सात्विक आणि त्यातही प्राधान्यानं शाकाहारावर अनेकांचाच भर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांसाहारावरील बंदी आणि शाकाहाराला दिलं जाणारं प्राधान्य हे अर्थातच ऐच्छिक आहे. कित्येकजण असे आहेत ज्यांच्यासाठी घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर कडक श्रावण आणि घराबाहेर मात्र तसं कोणतंही पथ्य नाही. 


इथवर हे सर्व ठिक होतं. पण, गुजरातमधील राजकोट भागात मात्र हा श्रावण नागरिकांवर लादला जात आहे. कारण, राजकोट पालिकेनं 1 ऑगस्टपासून पुढच्या महिन्याभरासाठी मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्तीवरील निर्देशही पालिकेकडून देण्यात आले आहेत. (Sawan shravan Gujarat Rajkot bans non veg for a month)


श्रावणी सोमवारचं महतत्वं पाहता राजकोट जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात अथवा उपहारगृहात मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी असणार आहे. प्रामुख्यानं चार श्रावणी सोमवार, जन्माष्टमी या दिवशी मांस, अंडं आणि मांसाहाराशी संबंधित पदार्थांची विक्री न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


या नियमाचं उल्लंघ केल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काळात गुजरातमधील इतर भागातही हा नियम लागू केला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. 


दरम्यान, श्रावण पाळणाऱ्यांचं ठिक, पण जी मंडळी श्रावणातही मांसाहार करतात त्यांच्यावरही हा महिना / हा नियम लादला जात आहे अशी नाराजी काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.