कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली
भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला.
मुंबई : भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. विजय माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव केल्यानंतर एसबीआयला ९६३ कोटी रुपये मिळाले आहेत. एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर अरिजित बसू यांनी ही माहिती दिली. माल्ल्याकडून वसुलीचा आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं लागू केल्यामुळे आम्ही खुश आहोत, असं बसू म्हणाले. न्यायालयाच्या या आदेशामुळे संपूर्ण पैसे वसूल करण्याची आशा वाढली आहे. भारतामध्ये माल्ल्याच्या १५९ संपत्ती आहेत, अशी माहिती बँकांनी दिल्लीतल्या न्यायालयाला दिली होती.
ब्रिटनच्या न्यायालयाचा निर्णय
ब्रिटनमधल्या न्यायालयानं भारताच्या १३ बँकांच्या बाजूनं निर्णय दिला. विजय माल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासाठीचा अर्ज बँकांनी न्यायालयाला केला होता. त्यामुळे युकेच्या हायकोर्टाच्या एन्फोर्समेंट अधिकाऱ्यांना विजय माल्ल्याच्या लंडनजवळच्या संपत्तीमध्ये जायची परवानगी मिळाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांना लंडनच्या तेविनमध्ये लेडीवॉक आणि ब्रेंबल लॉजमध्ये जायची परवानगी मिळाली आहे. विजय माल्ल्या सध्या इकडेच राहतो. विजय माल्ल्याच्या या संपत्तींचं पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. माल्ल्याच्या संपत्तीचं आधी मुल्यांकन झालं होतं, पण आता नव्यानं मुल्यांकन करून आम्ही कर्ज वसुलीसाठी माल्ल्याची संपत्ती विकू, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.