नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.  सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सुनावणी करत असताना न्यायाधीश लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आलाय. मृत्यूमागे घातपाताची शक्यताही वर्तविण्यात आलेय. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात चौकशी करण्याबाबत याचिकाही दाखल झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडापीठासमोर याप्रकरणी १६ मार्चला सर्वपक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर निर्णय राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी एका विशिष्ठ  व्यक्तीला मुद्दाम टार्गेट करण्यासाठी याचिका करण्यात आल्याचे म्हटलेय. तर कायद्याचं राज्य आहे हे जर सिद्ध करण्यासाठी न्यायाधीश लोयांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 


न्यायाधीश लोयांच्या मृत्यूनंतर घडलेल्या अनेक घडमोडींचा संदर्भ देऊन याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र चौकशी मागणी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात एका नियतकालिकाने न्यायाधीश लोयांच्या बहिणीच्या हवाल्यानं लोयांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून हे प्रकरण प्रकाश झोतात आले.  १४ जानेवारी रोजी न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे त्यांच्या चिरंजीवांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होते.