रायपूर: छत्तीसगढसारख्या नक्षलग्रस्त राज्यात सामान्य लोकांपर्यंत विकास आणि इतर सुविधा पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणांना बरीच मेहनत घ्यावी लागते. याठिकाणी नक्षलवाद्यांकडून अनेकदा विकासाचे प्रकल्प बंद पाडले जातात. त्यामुळे येथील अनेक भागांचा विकास आजही खुंटलेल्या अवस्थेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, नुकत्याच सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे सुकमा जिल्ह्यातील भेजी गावातील लहानग्यांना आशेची नवी किरणे दिसू लागली आहेत. या गावात असणारी शाळा २००५ साली नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे बंद पडली होती. मात्र, छत्तीसगढ सरकारच्या पुढाकारामुळे आता १३ वर्षांनी ही शाळा पुन्हा सुरु करण्यात आली. 


त्यामुळे या शाळेत पुन्हा लहान मुलांचे स्वर घुमू लागले आहेत. यानिमित्ताने या नक्षलग्रस्त परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अनेकांची अपेक्षा आहे. २००५ साली सलवा जुडूम या चळवळीने जोर धरल्यानंतर ही शाळा बंद पडली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी स्थानिकांना सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. ही चळवळ देशभरात चांगलीच गाजली होती. 


मात्र, या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर भेजी गावातील वातावरण तणावपूर्णच होते. मात्र, येथील शाळा पुन्हा सुरु झाल्याने स्थानिकांच्या मुलांना संधीची नवीन कवाडे उघडली आहेत. सध्या या शाळेत ५५ विद्यार्थी आहेत. आगामी काळात हा आकडा आणखी वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.