थोडी वाट बघा, राजस्थानमध्येही काहीतरी घडेल; भाजप मंत्र्याचे वक्तव्य
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राजस्थानमध्येही असाच राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती ओढावणार असल्याचे सांगितले जाते. लवकरच सचिन पायलट हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये जातील, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांकडून त्यांना सचिन पायलट हेदेखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच निर्णय घेतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शेखावत यांनी म्हटले की, थोडी वाट पाहा. शांतपणे प्रतिक्षा केल्यास त्याचे चांगले फळ मिळते, असे शेखावत यांनी म्हटले. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून नेत्यांमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये यावरून दोन्ही गटांमध्ये सातत्याने खटके उडाल्याची बाब अनेकदा समोर आली होती. मात्र, आता राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे.
'ज्योतिरादित्य कधीही माझ्या घरी येऊ शकत होते', राहुल गांधींनी मौन सोडलं
डिसेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या काळात राजस्थान सरकारकडून वृत्तपत्रे आणि विविध छापील माध्यमांतील जाहिरातींवर २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या सर्व जाहिरातींमध्ये केवळ मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीच छायाचित्रे होती. एकाही जाहिरातीमध्ये सचिन पायलय यांचे छायाचित्र छापण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य सिंधियांना 'अच्छे दिन'
या अंतर्गत कुरघोडी आणि राजकारणाला सचिन पायलट कंटाळले आहेत. त्यामुळे ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांनी केंद्रात अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. या दोघांची घराणीही बऱ्याच काळापासून राजकारणात आहेत. या समान दुव्यांमुळे सिंधिया आणि पायलट यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे सचिन पायलट वेगळी वाट चोखाळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.