नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे. अरुण जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात १० कोटी रुपयांची मानहानीची नवी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अरविंद केजरीवाल यांनी उत्तर द्यायला वेळ लावल्यामुळे त्यांच्यावर ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवालांना लागलेला हा ५ हजार रुपयांचा दंड सैन्य कल्याण कोषामध्ये जमा करण्यात येणार आहे. याआधीही केजरीवालांना १० हजार रुपयांचा दंड झाला होता. अरुण जेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना २६ जुलैला उत्तर द्यायचं होतं. पण हे लिखीत उत्तर दोन आठवड्यानंतर देण्यात आल्याचं अरुण जेटलींचे वकील माणिक डोगरा यांनी सांगितलं. यानंतर कोर्टानं दंडाची ही कारवाई केली.


दरम्यान हायकोर्ट रजिस्ट्रीनं दोन वेळा तांत्रिक आक्षेप घेतल्यामुळे केजरीवालांना लिखीत उत्तर द्यायला वेळ लागला, त्यामुळे केजरीवालांना माफ करावं, असा दावा केजरीवालांचे वकील ऋषिकेश कुमार यांनी केला. या दाव्यावर रजिस्ट्रारनं केजरीवालांना माफ केलं पण ५ हजार रुपयांचा दंड लावला. आता या प्रकरणाची सुनावणी १२ ऑक्टोबरला होणार आहे.