वरिष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि आईचा मृतदेह घरात, हत्येचा संशय
पंजाबमधील मोहालीत वरिष्ठ पत्रकार के.जे. सिंग आणि त्यांची ९२ वर्षीय आई गुरचरण कौर आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळलेत. त्यांची हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
मोहाली/ चंदीगड : पंजाबमधील मोहालीत वरिष्ठ पत्रकार के.जे. सिंग आणि त्यांची ९२ वर्षीय आई गुरचरण कौर आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळलेत. त्यांची हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. सिंग यांच्या गळयावर जखम झाल्याचे आढळले असल्याची माहिती मोहालीचे पोलीस उपाधीक्षक आलम विजय सिंग यांनी दिली.
दरम्यान, सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी पंजाब पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांच्या निर्देशावरुन एसआयटीची स्थापना करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. अजूनही पोलीस लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावू शकलेले नाहीत.
शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी टि्वट करुन के. जे. सिंग आणि त्यांच्या आईच्या हत्येचा निषेध केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची त्यांनी मागणी केली आहे.