नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात घडलेल्या काही घटनांचे पडसाद अगदी आजच्या दिवसापर्यंत उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. फाळणी... हा फक्त शब्द नाही, तर फाळणी हा एक असा प्रसंग होता, ज्यानं देश विभाजित झाला. कुटुंब दुरावली, आपली माणसं हिरावली आणि होत्याचं नव्हतं व्हायला काही तासही पुरेसे ठरले. (India Pakistan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1947 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान फाळणीमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. काहींची ताटातूटही झाली. यातच एका भावांच्या जोडीचाही समावेश होता. 


फाळणीनं ते दोघं दुरावले. पण, नियतीनं मात्र त्यांच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. 


पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहेबला भारताशी जोडणाऱ्या करतारपूर कॉरिडोरमुळं तब्बल 74 वर्षांनंतर दोन भाऊ एकमेकांना भेटू शकले. 


सोशल मीडियावर या क्षणांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला, जो पाहून साऱ्या देशाचे डोळे पाणावले. 


एकमेकांना पाहिल्यानंतर या दोन्ही भावंडांच्या अश्रूंचा बांध फुटला. सात दशकांहून अधिक काळानंतर भावाला समोर पाहून त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. 


'द न्यूज इंटरनॅशनल'च्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या फैसलाबादमधील मोहम्मद सिद्दीकी त्यांचा मोठा भाऊ हबीब, याची भेट घेतली. जे भारतातील पंजाबच्या फूलनवाल भागातून करतारपूर कॉरिडोरच्या सहाय्यानं करतारपूरला पोहोचले. 


फाळणीच्या वेळी मोहम्मद सिद्दीकी फारच लहान होते. त्यावेळी कुटुंबाची ताटातूट झाली. 


मोठा भाऊ हबीब भारतात मोठा झाला. तर लहान पाकिस्तानात. दोघांची आयुष्य त्यानंतर फार बदलली. 


इतक्या वर्षांनंतर एकमेकांना पाहून या दोघांनीही आपल्या या भेटीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. करतारपूर कॉरिडोरच्या माध्यमातून व्हिसामुक्त प्रवास करण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांच्या शासनाचेही आभार मानले.