कोट्यवधी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल
एटीएम फसवेगिरीची वाढती प्रकरणं पाहता पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेनं सप्टेंबर महिन्यात काही महत्त्वाच्या कार्यप्रणालींमध्ये बदल केले आहेत. फिक्स्ड डिपॉझिट, लोन, एटीएम अशा सेवांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळं बदललेले नियम थेट खातेदारांच्या व्यवहारांवर परिणाम करणार आहेत. त्यामुळं कोट्यवधी खातेधारकांसाठी ही महत्त्वाची आणि तितकीच मदतीची बातमी ठरु शकते.
एटीएम फसवेगिरीची वाढती प्रकरणं पाहता पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. SBI नं ATM मध्ये वन टाईम पासवर्ड, अर्थात ओटीपी वर आधारित ATM व्यवहारांची सुविधा चोवीस तासांसाठी लागू करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. १८ सप्टेंबरपासून देशातील सर्व एसबीआय एटीएममध्ये ही सेवा पुरवली जाईल. यापूर्वी रात्रीच्या वेळी एटीएमच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी ओटीपीची सुविधा राबवण्यात आली होती.
येत्या काळात स्टेट बँकेकडून ग्राहकांना लोन रिस्ट्रक्चर सुविधा देण्यासाठी लवकरच बँक एक डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. यामाध्यमातून खातेधारकांना मोराटोरियमची (SBI Loan Moratorium) सुविधा मिळेल. या महिन्याच्या अखेरीस हा प्लॅटफॉर्म लाँच केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
स्टेट बँकेकडून वरिष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सद्यस्थितीला घटता व्याजदर पाहता चांगला आणि फायदेशी व्याजदर देऊ करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
स्टेट बँकेनं पुन्हा एकदा खातेधारकांना धक्का देत व्याजदरात कपात केली आहे. SBI नं २ कोटींहून कमी रिटेल डोमेस्टीक टर्म डिपॉझिट व्याजावर १-२ वर्षांच्या 0.20 टक्क्यांनी कपात केली आहे. परिणामी एफडीवर मिळणारा फायदा आता कमी होणार आहे.