नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहे. रविवारी १९ मे रोजी ८ राज्यांत ५९ जागांवर मतदान होत आहे. पश्चिम बंगाल ह शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक चर्चेत राहिले.  इथं ९ मतदारसंघात मतदान होत असून  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, हिंसाचार असे सर्वच शेवटच्या टप्प्यात पहायला मिळाले. पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. तर तृणमूलचा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी ममता बॅनर्जींनी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातल्या १३ मतदारसंघात रविवारी मतदान होत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीत मतदान होत आहे. वाराणसी वगळता इतरत्र मात्र काँटे की टक्कर अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेस, सपा-बसपानं उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या केदारनाथला दर्शनासाठी जाणार आहेत. पंतप्रधान याआधी ३ मे २०१७, २० ऑक्टोबर २०१७ आणि ७ नोव्हेंबर २०१८ या दिवशी केदारनाथाच्या दर्शनाला गेले होते. केदारनाथाचे दर्शन घेतल्यावर पंतप्रधान ध्यान गुहेत जाणार आहेत. ध्यान गुहेची निर्मिती पंतप्रधानांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे. केदारनाथाचे पूजन केल्यावर तिथल्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षय तृतीयेला केदारनाथाच्या दर्शनासाठी जातात मात्र यंदा प्रचारामुळे त्यांना जाता आले नव्हते. आता उद्या पंतप्रधान केदारनाथला जातील.