मुंबई : ओडिशा येथे प्रवाशांनी भरलेल्या एका बसला भीषण अपघात झाला असून, यात काही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी कटक जिल्ह्यातील जगतपूर येथे असणाऱ्या महानदी पूलावरुन ही बस कोसळली आणि प्रवाशांवर काळाने घाला घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जवळपास ३० प्रवासी असणाऱ्या या बसमधील बारा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, इतरह प्रवासी जखमी असल्याचं कळत आहे.  ही बस कटक येथून अंगूलच्या दिशेने जात होती. 


जगतपूर येथे आल्यानंतर बस चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे. दरम्यान, याविषयीची माहिती मिळताच लगेचच बचाव कार्यासाठी काही संघटना तेथे पोहोचल्या आणि त्यांनी तातडीने बचावकार्यास सुरुवात केली. पोलिस यंत्रणांनीही स्थानिकांची मदत घेत बचावकार्यात योगदान दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं.



ओडिशाचे मुख्य मंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताविषयी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्य़ाचं जाहीर केलं आहे.  त्यासोबतच त्यांनी आरोग्य मंत्री प्रताप जेना यांना घटनास्थळी जाण्यास सांगत सदर प्रकरणावर जातीने लक्ष देत जखमींचा उपचार हा विनामूल्य करण्यात यावा असा आदेश दिला आहे.