नवी दिल्ली :  येत्या २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदीर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचा ठराव बुधवारी प्रयागराज येथील परमधर्म परिषदेत मंजूर करण्यात आला होता. यावेळी शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साधू-संतांना चार शिळा घेऊन अयोध्येकडे कूच करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर देशभरातील संतांनी अयोध्येच्या दिशेने कूच करण्यास सुरूवात केली होती. पण अयोध्येकडील कूच पुढे ढकलल्याची घोषणा शंकराचार्य यांनी केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्य यांना तशी विनंती केली होती. पूलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वाराणसीतून यांसंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रयागराज कुंभ मधून काशी येथे परतत असताना शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांची तब्ब्येत अचानक खराब झाली. त्यांना बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. हॉस्पीटलचे मुख्य चिकिस्तक अधिक्षक प्राध्यापक विजयनाथ मिश्र यांच्या नेतृत्वात कार्डियो, नेफ्रॉलॉजी, यूरॉलॉजी, मेडीसीन आणि ह्रद्य रोग विभागाच्या वरिष्ठ चिकित्सकांच्या दलाने शंकराचार्य यांच्या आरोग्याची तपासणी केली. स्वरुपानंद यांना तब्ब्येतीच्या कारणास्तव प्रयागराजमधून वाराणसीत आणण्यात आले होते. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांची विचारपूसही केली होती. 



 अयोध्या राम जन्मभूमीचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा खटला पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे. पुढील महिन्यात न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच हिंदुत्वावादी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारसमोर पेच उभा राहीला आहे. या पार्श्वभूमीवर तुर्तास तरी हे कूच पुढे ढकलण्यात आले आहे.