संघ आणि विहिंपचे लोक रामाला देव मानत नाहीत- शंकराचार्य स्वरूपानंद
केंद्र सरकारने वादग्रस्त जागेऐवजी दुसऱ्या जागी मंदिर निर्माण करण्याचा अर्ज दिलाय असे शंकराचार्य यांनी सांगितले.
नवी दिल्ली : द्वारिका- शारदा. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे अयोध्या राम मंदीर प्रकरणी आक्रमक झाले आहेत. सरकारला रामललाच्या जन्मभूमिवर मंदीर निर्माण करायचे नाही आहे असे ते म्हणाले. वादग्रस्त जमिनी व्यतिरिक्त इतर जागेवर मंदीर निर्माण करण्याचा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन हे जाहीर केल्याचे ते म्हणाले. राम मंदीर निर्माणासाठी अयोध्येत जाणार असून सर्वोच्च न्यायालयाने ज्या जागेला रामजन्मभूमी मानले आहे त्या जागी पायाभरणी करणार असल्याचेही स्वरूपानंद यांनी सांगितले.
आरएसएस, विहिप आणि भाजपाच्या लोक रामाला देव नाही तर आदर्श पुरूष मानतात. यासाठी केंद्र सरकारने वादग्रस्त जागेऐवजी दुसऱ्या जागी मंदिर निर्माण करण्याचा अर्ज दिलाय असे शंकराचार्य यांनी सांगितले.
रामजन्मभूमी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने सुनावणी होण्याआधीच नियम तोडून तुम्ही भूमीपूजन कराल का ? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी घोषित केली तिथेच रामलला विराजमान आहेत. तिथे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या जाण्यावर बंदी नाही. मग मला का थांबवतील ? मी तिथेच भूमीपूजन करणार असे शंकराचार्य यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे शंकराचार्य यांच्या घोषणेनंतर देशातील सर्व 543 संसदीय क्षेत्रामध्ये अयोध्या निर्माणासाठी 2172 दगड मागवण्यात आले आहेत. मंदिर निर्माणासाठी लागणाऱ्या चार प्रकारचे दगडांचे नाव शंकराचार्य यांनी नंदा, वद्रा, जमा आणि पूर्णा असे नामकरण केले आहे. या दगडातून आनंद, कल्याण, विजय आणि पूर्णतेची प्राप्ती होईल.