शरद पवार - राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आज नवी दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली.
नवी दिल्ली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात लोकसभा जागांबाबत तिढा कायम आहे. त्यामुळे आज नवी दिल्लीत शरद पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीचा तपशील दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात आलेला नाही. दरम्यान, शरद पवार यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाले ट्विट पवारांनी केले आहे.
आज संध्याकाळी राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली. यावेळी राहुल गांधींसोबत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी, याची चर्चा झाली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. आठ जागांपैकी पाच जागांचा प्रश्न निघाल्यात जमा आहे. आता तीन जागांचा निर्णय बाकी असल्याची खात्रीलायक माहिती आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेय.
दरम्यान, यात पाच जागांमध्ये जालना, औरंगाबाद, भिंवडी, अहमदगरचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तीन जांगापैकी एक पुण्याच्या जागेचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या जागांचा प्रश्न निकाली निघेल का, याची उत्सुकता शिगेला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता राष्ट्रवादीची मागणी पूर्ण करतात की महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकतात, याचीच उत्सुकता शिगेला आहे. याआधी मुंबईत दोन्ही काँग्रेसची बैठक झाली. मात्र, आठ जागांचा प्रश्न सुटला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही काँग्रेसच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, पवार आणि राहुल गांधी यांच्या चर्चेतील तपशील सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे अंदाज बांधण्यात येत आहे.