नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार आहे. दुपारी १२.३० वाजल्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींना भेटणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं. मात्र, यात कोणताही राजकीय ट्वीस्ट असल्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये गेले काही दिवस सरकारवर आणि भाजपावर आसूड ओढणाऱ्या अग्रलेखात आज शेतकरी प्रश्नावर नरमाईचा सूर आवळलेला दिसून येतोय. 'हतबल शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा' असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांचीही भेट घेऊ शकतात, कारण पंतप्रधान हे देशाचे असतात... असंही वक्तव्य संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलंय.


दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक


दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला, मंत्रीमंडळातील खातेवाटप, महामंडळाचे वाटप, किमान समान कार्यक्रम, विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांचं वाटप कसं असावं याबाबत तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत शिसेनेशी चर्चा केली जाईल. शिवसेनेबरोबर अंतिम चर्चा करण्याआधी दोन्ही पक्षात एकवाक्यता नर्माण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केल्याचं समजतंय. मात्र, या बैठकीला शरद पवार हजर राहणार नाहीत. राज्यातील इतर नेते किमान समान कार्यक्रमावर चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे.



मुंबईत शिवसेनेची बैठक


राज्यातल्या सद्य स्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. येत्या शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेची महत्वाची बैठक होणारेय. महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे जी राजकिय संभ्रम अवस्था निर्माण झालीय. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतायेत. या सर्व संभ्रम निर्माण झालेल्या प्रश्नांवर विश्वासाने चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणारेय. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेना कोणता निर्णय घेणार यावरच महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार हे ठरणार आहे.