National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


शरद पवार हेच राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यय असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. 2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. जे काही निर्णय आम्ही घेतले आहेत त्यामुळे आमची हिंम्मत वाढली असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले. 


मीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसरा कोणी काही बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाही, असेही पवार यावेळी म्हणाले. अजित पवारांनी तुमच्यावर वैयक्तिक हल्ला चढवलाय, तुमचं वय झालंय असं म्हटलंय, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मी 82 किंवा 92 वयाचा असेन तरी काम करत राहणार असे पवारांनी सांगितले. 


आमचा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील.लोकांचे समर्थन आम्हाला आहे. यावरच मला खूप विश्वास आणि आनंद असल्याचे पवार म्हणाले. 2024 ला सत्तांतर होईल. आणि जे विरोधी पक्षांच्या विरुद्ध काम झाले, त्याचे उत्तर जनता देईल.


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'चांगल आहे' असे उत्तर त्यांनी दिले. 


सुप्रीया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना जबाबदारी देण्यात आली पण मग अजित पवार यांना का डावलण्यात आले? या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले. त्यांना विरोधी पक्षनेत्याची महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.