भाजप आरोपांना जोरदार प्रत्युत्तर, `तो` ठराव हास्यास्पद - शरद पवार
Sharad Pawar On Devendra Fadnavis and BJP : भाजपच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नवी दिल्ली : Sharad Pawar On Devendra Fadnavis and BJP : भाजपच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातल्या ठरावावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खरपूस टीका केली आहे. भाजपचा राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद आहे, असे पवार म्हणाले. अधिकारांचा गैरवापर जिथे होतं आहे, त्याला एक्सपोज करण्याचे काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. जो अधिकाराचा गैरवापर होतोय त्याबाबत नवाब मलिक बोलत आहेत, वानखेडे प्रकरणी केंद्राने लक्ष दिलं पाहिजेत, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे कामही चांगले आहे, असे ते म्हणाले.
'भाजपकडून सत्तेचा गैरवापर'
भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले, सीमित कार्य काळाकरता ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेने पाहिला आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपचा राज्य कार्यकारिणीतला कालचा ठरावाबाबत सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याचा खोचक टोला पवार यांनी लगावला.
भाजपसोबत वर्षानुवर्ष काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत आहेत. दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आणि पवार यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी पवार यांनी भाजपवर टीका केली. नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असे ते म्हणाले.
ज्यांनी यापूर्वी भाजपासोबत काम केलं त्यांनी त्यांची कंपनी सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही बोललं जाते. पार्टटाइम मुख्यमंत्री या वक्तव्यात दम नाही, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट आले होते, पण तरीही ते काम सुरू करत आहे, असे सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
ईडी, सीबीआय 5 वर्ष मुदतवाढ
एकेकाळी मी सदस्य होतो, ही नियुक्ती पंतप्रधान, गृहमंत्री करतात. यापूर्वी विश्वासात घेऊन नियुक्ती व्हायची, आता होत नाही. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत आम्ही रणनीती ठरवू. त्रिपुरामध्ये जे झालं, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात जे झालं ते धर्मांध शक्तीमुळे झाले आहे. देशात धर्मांध शक्तीचे आव्हान आहे, असे शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, त्रिपुरात काही घडले तर महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात काही घडण्याची गरज होती असे मला वाटत नाही. काही शक्ती परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की त्या जातीयवादी शक्ती आहेत, सतर्क राहण्याची गरज आहे.
'मलिकांचे काम योग्य, गैरप्रकार रोखणे आवश्यक आहे'
अधिकारांचा गैरवापर जिथं होत आहे त्याला एक्सपोज करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गैरप्रकार रोखणे आवश्यक आहे. सीबीआय आणि ईडी संचालकांच्या निवडीमध्ये विरोधी पक्षांनाही स्थान असतं. तो अधिकार डावलण्याचे काम या निर्णयामुळे झाले. जो अधिकाराचा गैरवापर होतोय त्याबाबत नवाब मलिक बोलत आहेत, वानखेडे प्रकरणी केंद्राने लक्ष दिल पाहिजेत, असे पवार म्हणाले.