नवी दिल्ली : काँग्रेसच्या तिकीटावर बिहारच्या पटनामधून निवडणुकीच्या मैदानात असणारे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिन्ना यांचं कौतुक केलं आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये सौसरमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिन्ना यांचं देखील योगदान आहे. यावेळी मंचावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील उपस्थित होते. छिंदवाडा येथून कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ निवडणूक लढवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छिंदवाडाच्या सौसरमध्ये आयोजित या सभेत सिन्हा यांनी काँग्रेसचं कौतुक करत जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांचा देखील उल्लेख केला. पण यांच्या सोबतच त्यांनी जिन्नांचं देखील कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, ''सरदार पटेल ते नेहरू, महात्मा गांधी ते जिन्ना, इंदिरा गांधी ते राहुल गांधी यांचं भारताच्या स्वातंत्र्यात आणि विकासात महत्त्वाचं योगदान आहे. त्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो.'' काही दिवसांपूर्वीच अलीगढ यूनिवर्सिटी आणि इतर ठिकाणी जिन्नांचा फोटो लावण्यावरुन खूप वाद झाला होता.



सिन्हा यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की, 'काही तरी नाईलाज असेल अन्यथा कोणीही असंच बेवफा नाही होत.' सिन्हा यांनी म्हटलं की, व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा असतो. पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठा कोणी नसतो.'


मागच्या वर्षी अलीगढ मुस्लीम यूनिवर्सिटीमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांच्या फोटोवरुन वाद झाला होता. ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांच्या फोटोला लोकांनी विरोध केला होता.