लखनऊ: भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. पुनम सिन्हा यांनी मंगळवारी लखनऊ येथे अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो ट्विट करून पुनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सपा-बसपा-राजद युतीकडून त्यांना लखनऊमधून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. राजनाथ सिंह यांना लखनऊमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी काँग्रेसकडून पुनम सिन्हा यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. त्यासाठी काँग्रेस कदाचित लखनऊमध्ये उमेदवारच उभा करणार नाही. त्यामुळे राजनाथ सिंह आणि पुनम सिन्हा यांच्यात थेट लढत होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या लखनऊमध्ये चार लाख कायस्थ , साडेतीन लाख मुस्लीम आणि १.३ लाख सिंधी मतदार आहेत. पुनम सिन्हा या सिंधी आहेत तर त्यांचे पती शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ आहेत. त्यामुळे पुनम सिन्हा राजनाथ सिंह यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण करू शकतात. येत्या १८ तारखेला पुनम सिन्हा यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. यानंतर ६ मे रोजी लखनऊमध्ये मतदानप्रक्रिया पार पडेल. भाजपच्यादृष्टीने लखनऊ मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून एकदाही लखनऊमध्ये भाजपचा पराभव झालेला नाही. २०१४ मध्ये राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये काँग्रेसच्या रिटा बहुगुणा जोशी यांचा पराभव केला होता. 



काही दिवसांपूर्वीच खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटणा साहिब मतदारसंघातून रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिल्यामुळे सिन्हा नाराज झाले होते. त्यामुळे सिन्हा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता.