नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, बाबरी मशीद इतर ठिकाणी सुद्धा बांधली जाऊ शकते असं प्रतिज्ञापत्र शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे.


तसेच, राम मंदिरापासून एका ठराविक अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी अशी मागणीही काही नागरिक करत आहेत. मात्र, तसं झाल्यास वाद आणखी वाढतील असेही शिया वक्फ बोर्डाने म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.



राम मंदिर आणि बाबरी मशीद वाद सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल नेमण्यात यावे असेही शिया वक्फ बोर्डानं म्हटलं आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



दरम्यान, २०१० मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निकाल देत वादग्रस्त जागेला तीन भागांमध्ये विभाजित केले होते. त्यापैकी एक रामल्ला (राम जन्मस्थळ), दुसरा निर्मोही अखाडा आणि तिसरा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात यावा असे निर्देश दिले होते.