शिर्डीच्या साई संस्थानकडून भाविकांसाठी SOP जाहीर
मंदिरं उघडण्याची घोषणा केल्यानंतर आता शिर्डीच्या साई संस्थाननं आपली SOP जारी केलीये
शिर्डी : राज्य सरकारनं पाडव्यापासून मंदिरं उघडण्याची घोषणा केल्यानंतर आता शिर्डीच्या साई संस्थाननं आपली SOP जारी केलीये. त्यानुसार दररोज केवळ ६ हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार असून त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. तर कोल्हापुरात दररोज ३ हजार भाविकांना अंबाबाईचं दर्शन घेता येणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जाहीर केलंय.
राज्यातील मंदिरं खुली करण्याची घोषणा सरकारनं केल्यानंतर शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यामुळं गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थचक्राला उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या आंदोलनामुळे मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणत भाजपने राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील केलाय.
ही 'श्रीं ची इच्छा !
मंदिरे खुली करणे हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद राज्याला मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. या काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.