शिवसेना आपल्या नेतृत्वाखाली लोकप्रिय स्थिर सरकार बनवणार - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काही वेळापूर्वी सोनिया गांधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काही वेळापूर्वी सोनिया गांधी यांची 10 जनपथला भेट घेतली, चर्चा केली. यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, महाराष्ट्रात शिवसेना लवकरच आपल्या नेतृत्वाखाली लोकप्रिय आणि स्थिर सरकार बनवणार असल्याचं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
शरद पवार यांच्या भेटीचं नेमकं कारण संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं, 'तेव्हा संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झाल्याने, त्यांचे हाल होत आहेत'.
यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, 'अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल असताना महाराष्ट्रात, अशा स्थितीत जास्त दिवस राष्ट्रपती राजवट आहे, म्हणून केंद्राकडून कशी मदत करता येईल, याचा अनुभव शरद पवारांना आहे, म्हणून शरद पवारांनी यावर पंतप्रधानांची भेट घ्यावी, महाराष्ट्राची समस्या कुणीतरी ज्येष्ठ नेत्याने मांडावी, हे सांगण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.