टीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?
टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं.
नवी दिल्ली : टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं.
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून तेलगू देसम आणि केंद्र सरकारमधला वाद विकोपाला गेलाय. रात्री उशिरा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती इथं पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.
काय म्हणाले संजय राऊत?
एनडीएतले बहुतांश घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. एकेक करून सगळेच पक्ष बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. टीडीपीनं जे केलं, ते अपेक्षित च होतं, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
टीडीपीचे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री वाय.एस. चौधरी या दोन्ही मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आलेत. आज हे दोन्ही मंत्री आपले राजीनामे देण्याची शक्यता आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासूनच आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याची मागणी होतेय. मात्र केंद्र सरकारनं या दिशेनं पाऊल टाकलेलं नाही. काल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली होती.
ईशान्येकडील राज्ये आणि 3 डोंगराळ प्रदेश असलेली राज्यं वगळता अन्य कोणालाच घटनेनुसार विशेष राज्याचा दर्जा देता येऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. असं असलं तरी आंध्रप्रदेशला पुरेसा निधी दिला जाईल, असं आश्वासनही जेटलींनी दिलं. मात्र यावर तेलगू देसम समाधानी नाही. जेटलींचं हे विधान म्हणजे उंटाचा पाठीवरची शेवटची काडी असल्याचं नायडू म्हणाले. आपण पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसल्यंचा दावाही चंद्राबाबूंनी केलाय...