भोपाळ : काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवराजसिंह चौहान यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते कोणत्याही क्षणी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. १०४ आमदार असलेल्या भाजपचे आता विधानसभेत बहुमत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातलं काँग्रेसचे सरकार अवघ्या १५ महिन्यात कोसळले. कमलनाथ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगितलं होते. मात्र त्याआधीच त्यांनी दुपारी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.


त्याचवेळी त्यांनी कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना त्यांनी टोला लगावला आहे. भोपाळमधील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान म्हणाले की, दीड वर्षात राज्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. महिला, तरुण, तरुण सर्व या सरकारवर नाराज होते.


 मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. दुपारी  राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवणार. मी कधीही सौदेबाजीचं राजकारण केलं नाही. मी नेहमी स्वच्छ राजकारण केलं. पूर्ण मीडिया आणि जनतेला माहिती आहे की, १५ वर्षाच्या कार्यकाळात कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. मी कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला फोन केला नाही. कधी कोणासाठी शिफारस केली नाही. फक्त विकासाचं काम केले, असं कमलनाथ यांनी राजीनामा देण्याआधी स्पष्ट केले.