मुंबई : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.  भाजपा-सेनेच्या युतीबाबत मात्र प्रश्नचिन्हच पाहायला मिळत होते.  गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्य राजकारणात महत्त्वाचा विषय असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचा प्रश्न अखेर सुटल्याचे समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत 25-23 चे सुत्र घेऊन भाजपा शिवसेना निवडणूकीत उतरणार आहे. म्हणजेच भाजपा 25 जागांवर तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर विधानसभेसाठी 144-144 जागांचे सुत्र तयार करण्यात आले आहे. गेले अनेक दिवस युतीचे घोंगडे भिजत ठेवण्यात येत होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपाच्या धोरणांवर सातत्याने टीका करण्यात येत होती. त्याआधीच समान वागणूक मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार करत होते. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल वाढ, महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजपाला धारेवर धरले होते. त्यामुळे याच भाजपा सोबत शिवसेना पुन्हा सत्तेत बसण्यास तयार होईल का ? यावर सामान्य नागरिकांना प्रश्न पडला होता. आता युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून येत आहे. 


जागावाटप बाबत बोलणी झाली असली तरीही मुख्यमंत्री पदावरून अद्याप निर्णय झाला नसल्याचे वृत्तही समोर येत आहे.