पंतप्रधान मोदींच्या बैठकीत अरविंद सावंतांची उपस्थिती
राज्यात सध्या सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे.
नवी दिल्ली : राज्यात सध्या सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मोदी शहांच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे या बैठकीत ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत निर्णय झाला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत हे देखील उपस्थित आहेत.
शिवसेना भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी संघर्ष करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रतील पाठींबा काढून घ्यावा त्यानंतर चर्चेला बसू असा सूर आघाडीचा नेत्यांनी आळवला होता. पण शिवसेनेला ते मान्य नव्हते. सत्ता स्थापन झाल्यावर त्यांचा राजीनामा घेऊ असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना-भाजपाने सत्ता स्थापन करावी असे सूचक विधान केले. आणि २४ तासात हे सत्ता स्थापन करतील असेही म्हटले. एकिकडे भाजपाला विरोध करत असताना पंतप्रधान मोदींच्या बैठकीत अरविंद सावंत यांची उपस्थिती ही दुटप्पीपणाची भूमिका असल्याची टीका शिवसेनेवर होत आहे.
महत्त्वाचे निर्णय
मोदी शहांची बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.