केंद्र सरकारने सोमवारी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू केला आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा वादग्रस्त कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फार कमी कालावधी उरलेला असताना केंद्राने हा संवेदनशील कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं पाकिस्तानहून भारतात आलेल्या सीमा हैदरने स्वागत केलं असून, आनंद साजरा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएए लागू झाल्याने सीमा हैदरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सीमा हैदरला आपण लवकरच भारताचे नागरिक होऊ असा विश्वास आहे. याच आनंदात तिने लाडू वाटले आहेत. सीमा हैदरने सचिन आणि मुलांसह व्हिडीओ तयार करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. दरम्यान सीमी हैदर आनंद साजरा करत असल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच सत्यस्थिती सांगितली आहे. 


प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सीमा हैदरला टोला लगावला आहे. तिने लिहिलं आहे की, "ओके, पण ही नक्की कसला आनंद साजरा करत आहे? ना ती डिसेंबर 2014 च्या आधी भारतात आली आहे, ना पाकिस्तान पीडित अल्पसंख्यांक आहे".


प्रियंका चतुर्वैदी यांचा मॅरी मिलबेनलाही टोला


प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी आफ्रिकी-अमेरिकन गायिका मॅरी मिलबेनलाही टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "अमेरिकन नागरिक मॅरी मिलबेनही अमेरिकेत आनंद साजरा करत आहे, अजब". मॅरी मिलबेनने सीएए लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानत हा शांततेचा आणखी एक मार्ग आहे, लोकशाहीचं काम आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. 



सीमा हैदरने काय म्हटलं?


सीएए लागू झाल्यानंतर सीमा हैदरने म्हटलं होतं की, "भारत सरकारने आज आपल्या देशात सीएए लागू केलं आहे. आम्ही यामुळे फार आनंदी असून, सरकारचं अभिनंदन करत आहोत. मोदींनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं. मी आयुष्यभर त्यांची आभारी राहीन".


"मी माझा वकील भाऊ एपी सिंग यांचंही अभिनंदन करते. कारण आता माझ्या नागरिकत्वासाठी येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर होतील," असंही तिने म्हटलं. यावेळी तिने भारत माता की जय, जय श्री राम अशा घोषणाही दिल्या.


सीमा हैदर बेकायदेशीर मार्गाने पाकिस्तानमधून भारतात आली आहे. गतवर्षी मे महिन्यात आपल्या मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात पोहोचली होती. ती मूळची पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहेत. भारतातील आपला प्रियकर सचिनशी तिने लग्न केलं आहे. 


सीएए कायदा काय आहे?


31 डिसेंबर 2014 पूर्वी वा त्या दिवशी भारतात आलेल्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून गैर-मुस्लीम स्थलांतरितांना नागरिकत्व देऊ शकते. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातील अल्पसंख्याकांचा यामध्ये समावेश आहे.