नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्ली काँग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा केल्याची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रिया राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिली आहे. भक्कम पर्याय देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यामुळे शिवसेनेला राहुल गांधींचं नेतृत्त्व मान्य असल्याची चर्चा मात्र यानिमित्तानं सुरू झाली आहे. 


शिवसेना (shivsena) युपीएत (UPA) सहभागी होणार का प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी शिवसेना येत्या 24 तासात भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. काही चर्चा असतात त्या चार भिंतीत असतात, त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करायची असते. आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, त्यानंतर भूमिका स्पष्ट करु असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.


पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केलेल्या युपीएबाबतच्या वक्तव्यावरही या बैठकीत चर्चा झाली. विरोधी पक्षांचं एक मजबूत संघटन उभं राहवं, आणि ते एकच संघटन असावं असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे, शरद पवार यांचं मत आहे, तसंच ते राहुल गांधी यांचंही तेच मत आहे. भाजपला किंवा सध्याच्या दिल्लीतील राज्य व्यवस्थेला सशक्त पर्याय म्हणून विरोधी पक्षांची एक आघाडी असेल तर वेगवेगळया आघाड्या स्थापन न करता एकच आघाडी असावी, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. अनेक प्रमुख नेत्यांचंही हेच म्हणणं आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.


आम्ही आज महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सरकार चालवतो. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी हे एक प्रकारे मिनी युपीएच आहे. भिन्न विचारांची लोकं, भिन्न राजकीय पक्ष एकत्र येतात आणि आघाडी बनवतात, त्याचं एक महत्त्व असल्यांच संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


विरोधकांचं ऐक्य असेल, महाराष्ट्रातल्या सरकारविषयी असले, देशातल्या एकंदरीत परिस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीविषयी त्यांना उत्सुकता असते. आणि उत्सुकतेने राहुल गांधी याविषयी विचारत असतात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. सोनिया गांधीही यांनीही उद्धव ठाकरे यांच्याविषयी चौकशी केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.