`इतका आत्मविश्वास येतो कुठून, थोडा आम्हाला पण उधार द्या`, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत फायदा होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे
नवी दिल्ली : 127वं घटनादुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं, आज यावर राज्यसभेत चर्चा झाली. घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
'एखादी चूक झाली तरी तिचा इव्हेंट कसा करायचा आणि चूक सुधारल्यावर त्याचा उत्सव करायचा', हे मोदी सरकारकडून शिकण्यासारखं आहे. सरकारकडे इतका आत्मविश्वास येतो कुठून? थोडा आत्मविश्वास आम्हाला पण उधार द्या, आम्हालाही थोड्या आत्मविश्वासाची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यानी केली आहे.
सरकारने हे बिल आणलं, पण ते अर्धवट आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत फायदा होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संभाजी छत्रपती या सभागृहात बसले आहेत. ते या आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर जावी ही त्यांचीही भावना, त्यामुळे सरकारने सर्वांच्याच भावानांचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आमच्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली. आम्ही तर लढत राहिलो. त्यामुळे सामाजिक न्यायाची आस ठेवून आम्ही आलो आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराजांनी आपलं राज्य असलेल्या कोल्हापुरात सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी या देशात सर्वात आधी पाऊल उचललं होतं, 26 जुलै 1902 म्हणजे 119 वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षणाची घोषणी केली. आरक्षण देणारा हा राजा महाराष्ट्राचा होता. मराठा होता. आज तोच मराठा समाज रस्त्यावरून न्याय मागत आहे, त्यांना अधिकार हवेत, त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षणाचा हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.