नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामुळं शिवसेनेत नाराजीची भावना पसरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या रविवारी होणाऱ्या विस्तारात जेडीयूला दोन कॅबिनेट मंत्रीपदं दिली जाण्याची शक्यता आहे. जेडीयूचे लोकसभेत केवळ दोन खासदार आहेत. तर शिवसेनेचे १८ खासदार आहेत. त्यामुळं हा शिवसेनेवर अन्याय असल्याची भावना निर्माण झालीय. 


शिवसेनेकडं सध्या केवळ एकच कॅबिनेट मंत्रीपद असून, किमान आणखी दोन मंत्रीपदं द्यावी, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.


दरम्यान, राज्यसभा खासदाराला मंत्रीपद देण्यास शिवसेनेनं विरोध केलाय. लोकसभेतील खासदारालाच मंत्रीपद द्या, अशा भावना देखील शिवसेना खासदारांनी व्यक्त केल्यात.


हालचालींना वेग आलाय...


रविवारी सकाळी मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गेल्या तीन वर्षातल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर आधारित निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


प्रत्येक मंत्र्याला P म्हणजे पॉझिटिव्ह आणि N म्हणजे निगेटिव्ह असे शेरे देण्यात आले आहेत. ज्यांना P शेरा मिळाला त्यांचं मंत्रीपद कायम राहणार आहे. तर ज्यांना N शेरा मिळालाय त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. 


अरूण जेटलींकडे दोन महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. अर्थ किंवा संरक्षण मंत्रालयापैकी एक खातं दुसऱ्या बड्या मंत्र्याकडे सोपलं जाऊ शकतं. नुकतेच एनडीएमध्ये आलेले जेडीयूची दोन मंत्रीपदांवर वर्णी लागणार आहे.