बुलंदशहर : महाराष्ट्रातील Palghar पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्या प्रकरणाच्या चर्चा शमत नाहीत, तोच देशाला हादरवून सोडणारी आणखी एक घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे एका मंदिरात दोन (साधू) पुजाऱ्यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले असून, या प्रकरणी पुढीस पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिरातील या पुजाऱ्यांची गळा कापून हत्या करण्यात आली असून, मंदिरातील एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुपशहरच्या हद्दीत येणाऱ्या पगोना गावात ही घटना घडली आहे. पुजाऱ्यांच्या हत्येच्या संशयावरुन गावातीलच एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहितीही मिळाली आहे. 


 


सदर तरुण आणि मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये काही वाद झाला होता. त्यामुळे या घटनेसाठी संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं कळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर त्यांनी ताबडतोब तपासास सुरुवात केली. 


या प्रकरणीच्या तपासातून हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. ज्यामध्ये त्यांनी हत्या करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती दिली. 



मुरारी म्हणजेच राजू नावाचा एक व्यक्ती मंदिरात यायचा. जो खुप जास्त प्रमाणात भांग पिऊन धुंद असायचा. काही दिवसांपूर्वीच त्याने या साधू (पुजाऱ्यां)चा चिमटा चोरला होता. ज्यांतर या साधुंनी त्याला बोलवून चांगलेच बोल लगावले होते. त्याच धर्तीवर डोक्यात राग ठेवून आरोपीने तलवारीने या साधुंची हत्या केल्याची बाब समोर येत आहे. 


गावातील नागरिकांनी मुरारीला तलवार हातात घेऊन गावाबाहेर जाताना पाहिलं, त्याच धर्तीवर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. ज्यानंतर तो गावापासून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत सापडला. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलं असून पुढाल चौकशी केली जाणार असल्याची माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिली.