आताची मोठी बातमी! सिक्किममध्ये रस्ते अपघातात भारतीय सेनेचे 16 जवान शहिद
भारतीय सेनेची बस खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात 16 जवान शहिद झाल्याची माहिती
Sikkim Accident : सिक्किममधून (Sikkim) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. उत्तर सिक्किममध्ये भीषण अपघात झाला आहे. भारतीय सेनेची (Indian Army) एक बस खोल दरीत कोसळली. यात 16 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना लाचेनपासून 15 किलोमीटर दूरवर असलेल्या जेमा या ठिकाणी घडली. आज सकाळी साडेआठच्या सुमारास भारत-चीन सीमेजवळील उत्तर सिक्किममध्ये भारतीय जवानांची बस दरीत कोसळली. या अपघातात 16 जवान शहीद झाले तर 4 जवान जखमी झाले.
भारतीय सैन्याच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जखमी जवानांना एअर लिफ्ट करुन उत्तर बंगालमधल्या सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारतीय सैन्याच्या बसमध्ये 20 जण होते आणि ही बस सीमेवरच्या चौकीच्या ठिकाणी जात होती. जेमा या ठिकाणी पोहोचताच एक वळणावर बसचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह यांनी एक ट्विट केलं आहे. उत्तर सिक्किममध्ये झालेल्या रस्ते अपघातात भारतीय सेनेचे जवान शहीद झाल्याची बातमी ऐकून अति दु:ख झालं. देशाप्रती त्यांच्या सेवा आणि निष्ठेबद्दल कायम आभारी राहू. शहीद जवानांच्या कुटुंबाबरोबर माझी संवेदना आहे, जे जवान जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना... असं राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
मृतांमध्ये तीन ज्युनिअर ऑफिसर आणि 13 जवानांचा समावेश आहे. सर्व शहीद जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. लाचेन पोलिसांचं एक पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे. पोस्टमार्टमसाठी जवानांचे पार्थिव एसटीएनएम रुग्णालयात पाटवण्यात आले आहेत.