Brain Eating Amoeba : केरळमधील (Kerala) अलप्पुझा येथे दूषित पाण्यात राहणाऱ्या अमिबामुळे (Amoeba) 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूला दुर्मीळ संसर्ग झाल्यानं केरळच्या अलप्पुझामध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. जवळपास आठवडाभर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. गुरुदत्त हा दहावीत शिकत होता. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (primary amoebic meningoencephalitis) संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला ताप आणि झटके येत होते. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तपासणीत त्याच्या मेंदुला संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. यासोबतच लोकांनी दूषित पाण्यात आंघोळ करणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुदत्त 1 जुलैपासून अलप्पुझा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पानवली येथील झर्‍यात गुरुदत्त आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग झाला. घरी आल्यानंतर गुरुदत्तला सतत ताप आणि झटके येत होते. गुरुदत्तचे आई वडील शालिनी आणि अनिल कुमार यांनी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस इंफेक्शन झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.


केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, गुरुदत्तला 29 जूनपासून ताप येऊ लागला होता. दोन दिवसांनंतर त्यांना थुर्वूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. एन्सेफलायटीसच्या संशयावरून त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.  प्राथमिक तपासणीत रुग्णाचा नमुना प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचा नमुनाही पाठवण्यात आला होता.


काय आहे प्रायमरी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस?


प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) हा मेंदू खाणारा अमिबा म्हणजेच नाएग्लेरिया फॉवलेरीमुळे होतो. जेव्हा हा अमिबा नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो तेव्हा तो मेंदूच्या ऊतींना इजा करू लागतो. या संसर्गामध्ये मेंदूच्या ऊतींचा नाश होऊ लागतो. त्यानंतर मेंदूला सूज येते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. मेंदू खाणारा अमीबा म्हणजेच नाएग्लेरिया फॉवलेरी ही नायगलेरिया अमीबाची एक प्रजाती आहे. 


कुठे आढळतो अमिबा?


हा अमिबा  उबदार गोड्या पाण्याचे तलाव, झरे आणि मातीमध्ये आढळतो. तलाव किंवा जलाशयांमध्ये आंघोळ करताना या संसर्गाची बहुतेक प्रकरणे दिसून आली आहेत. हा अमिबा पाण्यात नाकातून शरीरात प्रवेश करू शकतो. जेव्हा कोणी या अमिबा असलेल्या पाण्यात पोहतो तेव्हा असे होऊ शकते. आत्तापर्यंत त्याचा  मानवाकडून मानवाला संसर्ग झाल्याचा कोणताही पुरावा नाही. हा एक दुर्मिळ संसर्ग आहे. हा अमिबा सामान्यतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान आढळतो. 2013 ते 2022 दरम्यान, अमेरिकेमध्ये याची 29 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


लक्षणे काय आहेत?


या अमिबाच्या संसर्गानंतर 1 ते 12 दिवसांत त्याची लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या होऊ लागतात. यानंतर, मानेमध्ये ताठरपणा, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे, शुद्ध हरपणे यासारखे प्रकार होऊ शकता. लक्षणे दिसू लागल्यानंतर, हा रोग वेगाने वाढतो आणि साधारणपणे 5 दिवसांच्या आत घातक ठरतो. काही प्रकरणांमध्ये, रुग्णाचा मृत्यू 1 दिवस ते 18 दिवसांच्या दरम्यान देखील झाल्याचे समोर आले आहे.