Coronavirus : पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोना, ७० ग्राहक क्वारंटाइन
ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का?
मुंबई : कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कम्युनिटीमध्ये कोरोना पसरताना दिसत आहे. असं असताना दिल्लीच्या दक्षिण भागात एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तब्बल ७० ग्राहकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील डिस्ट्रिक मजिस्ट्रेट बीएम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ७० ग्राहकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अद्याप यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्यात काही लक्षणे आढळून आल्यावरच त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि क्वारंटाइन केलेल्या ७० लोकांबाबत अद्याप काहीच अधिक माहिती दिलेली नाही. पिझ्झा डिलिव्हरी बॉय मार्चच्या अखेरीपर्यंत कामावर रूजू होता. पण दरम्यानच्या काळात ही व्यक्ती डायलिसिस करता हॉस्पिटलला गेला होता. यावेळीच त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाव्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी अन्न-धान्य आणि खाण्याच्या ऑनलाइन ऑर्डरवर कोणतेही नियम लागू नाहीत. कुठेही ऑनलाइन फूड ऑर्डरची डिलिव्हरी केली जात आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नाही मात्र ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यावर ते घरपोच दिलं जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बॅचरल राहणाऱ्या व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाइन फूड उपलब्ध आहे. मात्र या पिझ्झा डिलिव्हरी बॉयलाच कोरोनाची लागण झाल्यामुळे आता ऑनलाइन फूड ऑर्डर करणं किती सुरक्षेचं आहे यावर देखील प्रश्न उभे राहिले आहेत.