काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांचा गोळीबार, काश्मिरमध्ये 24 तासात 3 हल्ले
काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडितावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
जम्मू-काश्मिर : काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) पलायनाचा मुद्दा चर्चेत असतानाच एक भयानक घटना समोर आली आहे. काश्मीरच्या शोपियान (shopian) जिल्ह्यात एका काश्मिरी पंडितावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम राबवली जात आहे.
काश्मिरी पंडीताची प्रकृती चिंताजनक
काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी असे जखमी व्यक्तीचं नाव आहे. सोनू कुमार हे दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रगाम इथले रहिवासी आहेत. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी (terrorists) त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात सोनू कुमार यांना तीन गोळ्या लागल्या. त्यांना गंभीर अवस्थेत श्रीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोनू कुमार यांचं शोपियानमध्ये मेडिकल स्टोअर आहे. ते गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरमध्ये राहत आहेत. या हल्ल्याशिवाय गेल्या 24 तासांत दहशतवाद्यांनी खोऱ्यात 7 जणांवर हल्ला केला आहे.
लालचौक परिसरातही दहशतवादी हल्ला
याआधी श्रीनगरमधील लाल चौकाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम हाती घेतली. पुलवामामध्येही दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी दुसऱ्यांदा दोन गैर-काश्मीरींना लक्ष्य करून हल्ला केला. या हल्ल्यात बिहारमधील दोन जण जखमी झाले आहेत.