Shraddha Walkar Murder: आफताब पूनावाला यानेच मला मुलगी श्रद्धा वालकरची आपल्या हाताने गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं असा दावा श्रद्धाच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली कोर्टात सोमवारी श्रद्धा वालकरच्या वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. कोर्टात या हत्येप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात होते. श्रद्धाच्या वडिलांनी आफताब पूनावालाच्या त्या विधानाबद्दलही साक्ष दिली, ज्यामध्ये त्याने श्रद्धाचा गळा दाबल्यानंतर आपण एक करवत विकत घेत मनगट कापले आणि ते एका कचरापेटीत टाकले असं सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा वालकर ही आरोपी आफताब लिव्ह-इनमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर त्याने तिच्या शरिराचे तुकडे केले आणि विल्हेवाट लावण्याच्या हेतून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांना आरोपीच्या घराजवळ असणाऱ्या जंगलातून मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले आहेत. 


सरकारी वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांच्यासमोर फिर्यादी साक्षीदार म्हणून विकास मदन वालकर यांची साक्ष नोंदवली. यामध्ये त्यांनी सांगितलं की, 11 नोव्हेंबर 2022 रोजी मेहरोली पोलीस ठाण्यात गेलो होतो, जिथे मला पोलीस अधिकाऱ्यांनी पूनावालाची ओळख पटवण्यास सांगितलं होतं. "मी होकारार्थी उत्तर दिलं आणि हाच पूनावाला असल्याचं सांगितलं, जो गेल्या तीन वर्षांपासून माझ्या मुलीसह राहत होता. मी पोलिसांना तो नेहमी माझ्या मुलीशी भांडायचा आणि मारहाण करायची याचीही माहिती दिली," असं त्यांनी सांगितलं.


पोलीस ठाण्यात अधिकारी पूनावालाची 20 मे रोजी श्रद्धाच्या खात्यावरुन पैसे वळवल्यासंबंधी चौकशी करत होते. पण पूनावाला असं काहीच झालं नसल्याचं सांगत होता अशी माहिती त्यांनी दिली. माझी मुलगी कुठे आहे अशी चौकशी मी केली असता, त्याने आता ती जिवंत नसल्याचं सांगितलं असं विकास वालकर यांनी सांगितलं. 


"मला धक्का बसला आणि चक्कर येऊ लागली. थोड्या वेळाने मी सावरलो असता, पूनावालाने माझ्या मुलीची हत्या कशी केली हे सांगण्यास सुरुवात केली. त्याने मला सांगितलं की, 18 मे 2022 रोजी माझ्या मुलीशी त्याचे छतरपूर येथील निवासस्थानी भांडण झालं होतं. नंतर मी स्वत:च्या हातांनी श्रद्धाचा गळा दाबला”. 


पूनावालाने मला सांगितलं की, श्रद्धाला मारल्यानंतर त्याने हार्डवेअरच्या दुकानातून करवत, दोन ब्लेड, एक हातोडा खरेदी केलं होतं. रात्री त्याने तिचे दोन्ही मनगट कापून पिशवीत भरुन ठेवली असाही खुलासा त्यांनी केला. 


विकास वालकर यांनी यावेळी जानेवारी 2020 मध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा आफताबची भेट झाल्याचं सांगितलं. श्रद्धाच त्याला मुंबईतील घरी घेऊन आली होती. श्रद्धाच्या कुटुंबाने आफताबसह लिव्ह-इनमध्ये राहण्यास विरोध केला होता. पण नंतर श्रद्धा घर सोडून आफताबसब दिल्लीत आली होती. कोर्टाचं पुढील कामकाज 5 ऑगस्टला होणार आहे.


फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) नुसार, सरकारी वकिलामार्फत फिर्यादीच्या खटल्याच्या समर्थनार्थ साक्षीदार तपासले जातात आणि शेवटी, बचाव पक्षाचा वकील साक्षीदारांची उलटतपासणी करतो.