नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महंत नृत्यगोपाल दास यांना ट्रस्टचं अध्यक्ष नेमण्यात आलं, तर विश्व हिंदू परिषदेच्या चंपत राय यांची महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा भवन निर्माण समितीचे अध्यक्ष असतील. गोविंद गिरी यांना कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत मंदिर बांधायला कधी सुरुवात होणार? याबाबत निर्णय झालेला नाही. या प्रश्नाचं उत्तर १५ दिवसांनी मिळणार आहे. अयोध्येमध्ये या ट्रस्टची दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीत भवन निर्माण समिती आपला रिपोर्ट सादर करणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार जुन्या राम मंदिराच्या मॉडेलवरच राम मंदिराची उभारणी होणार आहे. 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चं बँक खातं अयोध्येच्या एसबीआय बँकेत उघडण्यात आलं आहे. अकाऊंटचं संचलन अनिल मिश्रा, गोविंद देव गिरी आणि चंपत राय करणार आहेत. दिल्लीतली फर्म व्ही.शंकर अय्यर ऍण्ड कंपनीची ट्रस्टचं चार्टड अकाऊंटट म्हणून नेमणूक झाली आहे.


'लोकांच्या भावनांचा आदर करत लवकरच मंदिर निर्माण होईल. राम मंदिराचं मॉडेल तेच राहिल, पण त्याला थोडं उंच आणि विस्तृत केलं जाईल.' असं अध्यक्ष झालेल्या नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या या समितीची पहिली बैठक जवळपास सव्वादोन तास चालली.



बैठकीला कोणाची उपस्थिती 


महंत नृत्यगोपाल दास


महंत दिनेंद्र दास


गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव ज्ञानेश कुमार


होमिओपथी डॉक्टर अनिल कुमार मिश्रा


चंपत राय (व्हीएचपी)


शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती


उत्तर प्रदेश अपर प्रधान गृहसचिव अवनीश अवस्थी


परमानंद महाराज


अयोध्या जिल्हाधिकारी अनुज झा


कामेश्वर चौपाल


पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी


पुण्याचे स्वामी गोविंद देवगिरी


अयोध्या राज परिवाराचे विमलेंद्र मोहन मिश्र