कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : भारतात अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो मात्र भारतात एक व्यक्ती असाही होऊन गेला जो अष्टूपैलू होता. भारतात नाही तर त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. या व्यक्तीने अखेरच्या श्वासापर्यत प्रामाणिकपणे काम केले... त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारतात ओळखलं जावू लागलं... असे अत्यंत हुषार आणि दुर्मिळ असे व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. श्रीकांत जिचकार... डॉ. जिचकारांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ मध्ये नागपूरमधील काटोल या तालुक्यात झाला होता. लहापणापासूनच डॉ. जिचकार हे कुशाग्र बुद्धीचे होते. डॉ. जिचकर यांच्या नावाचा 'सर्वात योग्य आणि शिक्षित व्यक्ती' (most qualified person) म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये उल्लेख आहे. त्यांचा हा रेकॉर्ड आजवर कुणीही मोडू शकलेलं नाही, हे विशेष.


अष्टूपैलू व्यक्तीमत्व


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डॉ. जिचकार यांनी १९७३ पासून तर १९९० पर्यंत ४२ विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या होत्या. डॉ. जिचकार हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी तब्बल २० विषयांत पदवी संपादन केली आहे. एवढेच नव्हे तर, अनेक विषयांत त्यांनी चांगले गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी मिळवली... आणि सुवर्ण पदकही पटकावले. डॉ. जिचकारांनी वैद्यकीय क्षेत्रापासून त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. 


छाया सौजन्य- सोशल मीडिया

डॉ. जिचकारांना संशोधनाची आवड होती. त्यांनी अनेक विषयात संशोधन केले आहे. त्यांनी शेती, राजकारण, पत्रकरिता आणि वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केले होते. त्यांनी सर्वप्रथम 'वैद्यकीय' क्षेत्रात पदवी मिळवली होती. एम.बी.बी.एस पूर्ण झाल्यावर त्यांनी एम.डी.देखील केले. नंतर त्यांची एम.एस करण्याची इच्छा झाली मात्र त्यांचा विचार बदलला आणि डॉ. जिचकार यांनी एल.एल.बी केले. त्यानंतर त्यांनी एल.एल.एम (इंटरनॅशनल लॉ) चा अभ्यास सुरू केला. त्यातही त्यांनी पदवी घेतली. डॉ. जिचकार इथेच थांबले नाहीत... त्यानंतर त्यांनी एम.बी.ए. देखील पूर्ण करून पत्रकारितेतही पदवी हस्तगत केली. डॉ. जिचकारांनी १० विषयात एम.ए केले आहे. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, राज्यशास्त्र, इंग्रजी साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, प्राचीन इतिहास संस्कृत आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे 


डॉ. जिचकार यांनी १९८७ मध्ये सिव्हिल सर्विसेज परीक्षा पास केली. त्यांना आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) हा विभाग मिळाला. परंतु, आय.पी.एस अधिकारी म्हणून काम न स्वीकारता यांनी पुन्हा एकदा सिव्हिल सर्विस परीक्षा दिली. त्यानंतर त्यांना IAS (इंडियन एडमिनिस्ट्रेटीव्ह सर्विसेज) विभाग मिळाला. मात्र या विभागातही काम करण्याची इच्छा त्यांना उरली नाही. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला. १९८३ मध्ये 'जगातील १० प्रमुख युवा व्यक्तीं'च्या यादीत डॉ. जिचकार यांचंही नाव होतं. डॉ. जिचकार हे एक चांगले वक्ता होते. त्यामुळे अनेक विद्यालयात त्यांना अर्थशास्त्र, आरोग्य आणि धार्मिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलवत असत. त्यांनी नागपूरमध्ये एका विद्यालयाची त्यांनी स्थापनादेखील केली.


राजकीय कारकीर्द



१९८० या साली २५ वर्षीय डॉ. जिचकारांनी महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात कमी वयाचे आमदार बनण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. त्यांच्याकडे एकेकाळी १४ खात्यांचा कारभार होता. ही त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी होती. त्यानंतर त्यांची गाडी इथेच थांबली नाही त्यांची धाव फार मोठी होती. खूप कमी वयात त्यांना खूप काही करण्याची त्यांची इच्छा होती. १९९२ ते १९९८ राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली होती.


छाया सौजन्य- सोशल मीडिया

डॉ. जिचकार हे पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासाठी खास होते. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट इंदिरा गांधींबरोबर करून दिली. जिचकरांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली मात्र यावेळी त्यांना यश मिळालं नाही. परंतु, त्यांनी हा पराभव सहजा-सहजी न स्वीकारता आपलं काम सुरूच ठेवलं. त्यामुळे पुढे त्यांना राजकारणातदेखील सफलता मिळाली. इ.स. १९९२ साली त्यांची भारताच्या राज्यसभेवर निवड झाली. ते इ.स. १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो व युनिस्को संघटनांसाठीही काम केले. 
 


आवड



डॉ. जिचकारांना छायांकन, चित्रकला, संगीत या विषयाची आवड होती. डॉ. जिचकारांना वाचण्याची खूप आवड होती. त्यांच्याकडे ५२००० हून अधिक पुस्तके होती. त्यांची वैयक्तिक लायब्ररी होती. डॉ. जिचकारांना गीता, उपनिषद, वेद-पुराण इत्यादी ग्रंथांचे ते जाणकार होते. डॉ. जिचकारांना फिरायला फार आवडत असे त्यामुळे त्यांनी अनेक देशांची यात्रादेखील केली.


 


निधन 



२ जून २००४ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी डॉ. जिचकार यांचं एका कार दुर्घटनेत निधन झाले. नागपूरजवळच त्यांच्या गाडीला एका बसने धडक दिली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.डॉ. जिचकारांचं निधन हा नागपूरकरांसाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी एक धक्का होता.