नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील भारत आणि चिनी सैनिकांमधील तुंबळ हाणामारीमुळे दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न आणखीनच चिघळला आहे. या झटापटीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही पाच जवान या झटापटीत मारले गेल्याचे समजते. यानंतर राजकीय आणि लष्करी घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. या सगळ्यासाठी चीनची जाणुनबुजून खोड काढण्याची वृत्ती कारणीभूत ठरत आहे. काही दिवसांपूर्वी सिक्किममधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी एका भारतीय लेफ्टनंटने चीनच्या मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला एका बुक्कीत लोळवले होते. यानंतर चिनी अधिकाऱ्यांच्या नाकातून रक्तही वाहायला लागले होते. मात्र, यानंतर दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण अधिक वाढून न देता चर्चा करून तोडगा काढला होता. 'द क्विंट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सिक्कीमच्या Muguthang परिसरात भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याला अडवले होते. त्यावेळी चिनी सैन्यातील एका अधिकाऱ्याने मग्रुरी दाखवत ही (सिक्कीम) तुमची भूमी नाही, हा भारताचा भाग नाही. त्यामुळे इथून परत जा, असे भारतीय सैनिकांना उद्देशून म्हटले. 


यावेळी भारतीय तुकडीत असणाऱ्या लेफ्टनंट दर्जाच्या जवानाचा राग अनावर झाला. हा अधिकारी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला आहे. त्याचे आजोबा ब्रिटिशांच्या रॉयल आर्मीत व नंतर भारतीय वायूदलात कार्यरत होते. तर त्याचे वडील सैन्यदलात कर्नल होते. साहजिकच राष्ट्रभक्ती रक्तातच असणाऱ्या या भारतीय अधिकाऱ्याला चिनी अधिकाऱ्याचा उद्दामपणाचा राग आला. या भारतीय लेफ्टनंटने तात्काळ चिनी अधिकाऱ्याला जाब विचारला. सिक्कीम आमचा प्रदेश नाही, असे तुम्ही म्हणूच कसे शकता, असे भारतीय लेफ्टनंटने म्हटले. 

यावेळी चिनी तुकडीतील मेजर दर्जाचा अधिकारी आक्रमकपणे चाल करून आला. तेव्हा या लेफ्टनंटने एका बुक्कीत चिनी मेजरला खाली लोळवले. जोरात खाली आदळल्यामुळे चिनी मेजरच्या छातीवरील नावाचा बिल्ला खाली पडला. यानंतर हे प्रकरण आणखी वाढणार असे दिसतात इतर जवानांनी या लेफ्टनंटला मागे खेचले. या कृत्याबद्दल सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले असले तरी अशाप्रकारे मोठ्या वादाला आमंत्रण दिल्याप्रकरणी वरिष्ठांनी या लेफ्टनंटला सबुरीचा सल्ला दिला. या प्रकारानंतर त्याला सीमारेषेवरील पोस्टवरून माघारी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे हा लेफ्टनंट जरासा नाराज असला तरी त्याला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाही.

लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही या लेफ्टनंटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोलकाता आणि सुकना येथील प्रादेशिक मुख्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी फोन करून या लेफ्टनंटची प्रशंसा केली. या धाडसी कृत्यासाठी या अधिकाऱ्याचा गौरव होणार होता. मात्र, खराब हवामानामुळे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी Muguthang परिसरात येऊ शकले नव्हते. परंतु, सध्या भारतीय सैन्यदलात सिक्कीमधील या किस्स्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.