Sikkim Avalanche Update: सिक्कीममध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिमस्खलनामुळे जवळजवळ 150 पर्यटक अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ही दुर्घटना दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली. या दुर्घटनेसंदर्भातील प्राथमिक माहिती समोर आली असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक उपस्थित असतानाच जवाहरलाल नेहरु मार्गावरील 14 मील या ठिकाणी हे हिमस्खलन झालं आहे. 70 ते 80 पर्यटक बर्फाखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अनेकजण गंभीर जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक पर्यटकांना बर्फाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जेवढ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे त्यापैकी 30 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. सोनम तेनजिंग भूटिया आयजी चेकपोस्टने दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींना एसटीएनएम आणि मणिपाल येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.



14 मीलवर बचावकार्य


सिक्कीम पोलिसांबरोबरच भारतीय लष्कर, पर्यटन विभागाचे अधिकारी, स्थानिक चालक या बचाव मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. रस्ते सुरक्षा संघटनेनं (बीआरओने) दिलेल्या माहितीनुसार सिक्कीममधील हिमस्खलनानंतर गंगटोक आणि नाथुलाला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरु मार्ग 14 मीलवर बचावकार्य सुरु आहे.



80 वाहनं सुखरुप बाहेर 


आतापर्यंत बर्फाच्या ढिगाऱ्या खालून 22 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. रस्त्यावरुन बर्फ काढण्यात आल्यानंतर दुसऱ्या बाजूला अडकलेले 350 पर्यटक आणि 80 वाहनांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पर्यटकांना 13 मीलपर्यंत जाण्याची परवानगी असते. मात्र पर्यटक पुढपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात.



पर्यटकांना 15 मीलचं आकर्षण


पर्यटकांना 15 मील परिसराचं विशेष आकर्षण असून येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच जास्त आहे. 14 मील जवळ हिमस्खलन झाल्याने या 15 मील परिसरात अडकून पडलेल्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.